मुदत संपत आली असल्यामुळे पालकांचे टेन्शन वाढले
मुंबई: खाजगी शाळांमधील २५ टक्के जागांवरील राखीव प्रवेश चालू असून आज त्याची मुदत संपत आहे. अनेक ठिकाणी पालकांना प्रवेश मिळाला आहे, त्यांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली आहे परंतु शाळा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करीत नाही अशा तक्रारी येत आहेत. संदर्भात 'आप पालक युनियन' कडे अनेक तक्रारी आल्या असून मुदत संपत आली असल्यामुळे पालकांचे टेन्शन मात्र वाढलेले आहे.
आज अखेर प्रवेश झालेल्यांची संख्या मागील वर्षापेक्षा कमी आहे. प्रशासन याबाबतीत पालकांना सक्रिय मदत करत नाही अशा तक्रारी वाढत आहेत. या जागा रिक्त राहणार नाहीत याची जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांची आहे. त्यांच्यावर शिक्षण विभागाचा वचक नाही त्यामुळे याबाबतीत गटशिक्षणाधिकारी पुढाकार घेताना दिसत नाही.
आम आदमी पार्टीच्या 'आप पालक युनियन' चे मुकुंद किर्दत यांनी सांगितले की अनेक शाळा पालकांकडे वेगवेगळ्या कारणाने अतिरिक्त फी रक्कम मागत आहेत.
तिळवनी, हातकणंगले येथील रॉयल इंग्लिश स्कूल, तसेच संजय घोडावत इन्स्टिट्यूट,जयसिंगपूर येथे त्या शाळेच्या नियमित फी मधून केवळ प्रतिपूर्ती रक्कम वजा करून उर्वरित रक्कम पालकांनी भरावी तरच आम्ही प्रवेश देऊ असे सांगितले जात आहे. ही रक्कम ३० ते ६० हजार पर्यंत जाते आहे.
दुसरीकडे मुलुंड पूर्व मधील बॉम्बे प्रेसिडेन्सी स्कूल या शाळेमध्ये नर्सरीला प्रवेश दिला आहे. परंतु सरकारकडून पूर्व प्राथमिक नर्सरीला प्रतिपूर्ती दिली जात नसल्याचे कारण सांगून पालकांकडून पूर्ण पैसे मागितले जात आहेत. ही रक्कम ७५ हजार रुपये आहे. पुणे विभागातील अनेक शाळांमध्ये ऍक्टिव्हिटी फी च्या नावाने पैसे मागितले जात आहेत. या खाजगी शाळा मोठ्या ॲक्टिव्हिटी फी नावाने फसवणूक करतात ही भावना वाढीस लागली असून शिक्षणाधिकारी पालकांना सहकार्य करत नाहीत असा अनुभव येत आहे. शासनाची प्रतिपूर्ती रक्कम मोठ्या प्रमाणावर थकीत असल्यामुळे हे प्रकार घडत आहेत असा आरोप मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
किर्दत यांनी म्हटले आहे की तर दुसरीकडे ज्याची मुले आरटीई अंतर्गत शिकत आहेत, त्यांनाही अँक्टिव्हिटी फी नावाने अतिरिक्त रक्कम मागितली जात आहे. हे पैसे ज्यांनी दिले नाहीत त्यांचे रिझल्ट दिले जात नाहीत. पुणे शहरातील पंडितराव आगाशे शाळेत ६००० रुपये दिले तरच रिझल्ट शीट देऊ असे सांगून पालकांना परत पाठवले जात आहे.



